Monday, March 21, 2011

पावसापुढे हार न मानता

पावसापुढे हार न मानता,
वाऱ्यापुढे न झुकता
बर्फ किंवा रणरणत्या उन्हापुढेही न झुकता
शक्तिशाली शरीरयष्टीची
इच्छा न बाळगणारा
नेहमी शांतपणे हसणारा
रोज चार कप भात खाणारा
मिसो व भाजी खाणारा
प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेणारा
पण नीट निरीक्षण करून समजून घेणारा
आणि न विसरणारा
पाईन वृक्षांच्या सावलीत, वनराईत
छोट्या गवती झोपडीत राहणारा
जर पूर्वेला एखादे आजारी मूल असेल
तर त्याची काळजी घेण्यासाठी जाणारा
जर पश्‍चिमेला एखादी आई दमलेली असेल
तर भाताच्या रोपांचा गुच्छ घेऊन जाणारा
जर दक्षिणेला कोणी मृत्यूशय्येवर असेल
तर तेथे जाऊन "घाबरू नकोस" असे म्हणणारा
जर उत्तरेला भांडणे अथवा खटलेबाजी सुरू असेल
तर "हे सारे थांबवा, हे बिनमहत्त्वाचे आहे" असे सांगणारा
दुष्काळाच्या वेळी अश्रू ढाळणारा
शीतल उन्हाळ्यात भांबावून चालणारा
ज्याला सगळे "ठोंब्या" म्हणतात
ज्याचं कोणी कौतुक करत नाही
ज्याच्याबद्दल कोणाला काळजी वाटत नाही
तशा प्रकारचा माणूस
मला व्हायचं आहे..

- मियाझावा केंजी (जपानी कवी)
अनुवाद : हर्षद फडके

No comments:

Post a Comment