Thursday, June 6, 2013

पाऊस … माझ्या मनातला…

हा पाऊस असतो -

आपल्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहायला लावणारा ,

सळसळणारा वारा , विजांचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट,

वातावरणात एक सुखद गारवा , वेगळीच धुंदी घेऊन येणारा ,

सर्वांनाच वेडावणारा , सुखावणारा ,

सगळीकडे नवचैतन्याची उधळण करणारा ,

आपल्या टपोऱ्या थेंबांनी पानांवर दवाबिंदुंच्या मोत्यांची पखरण करणारा ,

व्यवहाराची गणितं न मानणारा ,

सगळ्या चौकटी मोडून मुक्तपणे बरसणारा ,

वेळकाळाचं कुठलंही बंधन न जुमानता मनसोक्त बागडणारा ,

कधी उग्र , विराट तर कधी सौम्य रूपाचं दर्शन घडवणारा ,

आपल्या जवळचं सर्व संचित मुक्तपणे उधळणारा ,

कधीकधी मनाला अनामिक हुरहूर लावणारा ,

बरसणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक मनात वेगळेच विचार , आठवणी , स्वप्नं जागवणारा ,

आपल्या आयुष्याशी एक वेगळंच नातं जोडणारा ,

असताना अथवा नसतानाही आपलं आयुष्य मात्र व्यापून टाकणारा ..

हे सगळं लिहितांनाच आठवांचा पाऊस मात्र डोळ्यांत कधी साचला हे कळलंदेखील नाही.

या पावसाची हि अशीही एक वेगळीच अनुभूती …..