Thursday, June 17, 2010

तू...!

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..
पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते............ ....फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..

No comments:

Post a Comment